कारची स्कुटीला धडक; तरुणाचा मृत्यू

। नागोठणे । प्रतिनिधी ।

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारची स्कुटीच्या मागील बाजूस धडक बसून झालेल्या अपघातात पेण येथील स्कुटी चालक मच्छिंद्र घासे (36) याचा कामोठे येथील एम.जी.एम. हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात पेझारी – नागोठणे मार्गावरील रिलायन्स कंपनीच्या मार्केटिंग बिल्डिंग समोर रविवारी (दि.15) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील कारचालक अमित राजकुमार सिंग, हा त्याचे ताब्यातील वाहन रेनॉल्ट क्वीड कार ही कुहीरे बाजूकडून नागोठणे बाजूकडे घेऊन जात होता. त्याचवेळी तरशेत गावातून रिलायन्स कंपनीत आपल्या ॲक्टीवा मोटार सायकलवरून जाणारे मच्छिंद्र घासे त्यांच्या स्कुटीला मागील बाजूस कारची जोरात धडक लागली. त्यामुळे स्कुटी चालक मच्छिंद्र घासे यांना लहान मोठ्या स्वरुपाच्या गंभीर दुखापती झाल्या. त्यामुळे त्यांना प्रथम रिलायन्स कंपनीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे पाठवण्यात आले. तिथे उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version