ताम्हणी घाटात कार पलटी, एकाचा मृत्यू; सहाजण जखमी

। माणगाव । प्रतिनिधी ।
ताम्हणी घाटात माणगाव – पुणे रस्त्यावर कोंडेथर गावाच्या हद्दीत अवघड वळणावर सँट्रो कार पलटी झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.


सदरील अपघात शुक्रवारी (दि.३ जून) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद गौरी राहुल पंडित(वय-३७) रा.विश्रांतीवाडी पुणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर अपघातातील आरोपी राहुल प्रकाश पंडित (वय-४२) रा.विश्रांतीवाडी पुणे हे त्यांच्या ताब्यातील सँट्रो कार क्र.एम.एच.१२ सीडी ८९४३ ही गाडी पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे स्वतः चालवीत घेऊन जात असताना कोंडेथर गावच्या हद्दीत ताम्हाणी घाटात रस्त्याच्या अवघड वळणाच्या तीव्र उतारावरून जाताना गाडी भरधाव वेगाने चालविल्याने सदरची कार पलटी होऊन खोल दरीत जाऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील आरोपी यांचे वडील प्रकाश मुरलीधर पंडित (वय-७३) रा.विश्रांतीवाडी पुणे यांचा मृत्यू झाला. तर कारमधील आरोपी यांचे नातेवाईक गौरी राहुल पंडित (वय-३७), प्रणीला प्रकाश पंडित, सान्वी राहुल पंडित, अर्जुन राहुल पंडित, मंजुश्री कवी पंडित, राहुल प्रकाश पंडित(चालक) हे सहाजण जखमी झाले.

या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस करण्यात अली असून आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आघाव यांनी अपघात ठिकाणी भेट दिली. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोरवे हे करीत आहेत.

Exit mobile version