गुन्हे शाखा कक्ष-1ची कारवाई; 12 गुन्ह्यांची केली उकल
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल, कामोठे, खारघर, रबाळे, कोपरखैरणे परिसरातून सन 2021 मध्ये मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हद्दीतून देखील मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. सदर गाड्या गुन्हे शाखा कक्ष 1 ने आरोपिंसह हस्तगत केल्या आहेत. तमिळनाडू राज्यातून एकुण 54 लाख रूपये किमंतीच्या 9 मारुती सुझुकी इको कार हस्तगत करून एकूण 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोना शशीकांत जगदाळे, पोना निलेश किंद्रे, पोशि आशिष जाधव व पोशि विशाल सावरकर या पथकाने नमूद गुन्ह्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात करून, मारुती इको कार ही रबाळे दिवागाव सर्कल, ऐरोली टोल नाका, पुढे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कामराजनगर, सांताकुझ, चेंबूर जोडरस्ता, कुर्ला, बिकेसी एमटीएनएल अशी गेल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांना तांत्रिक माहितीनुसार एका आरोपीचा संपर्क क्रमांक मिळाला. या क्रमांकावरून आरोपींनी एकमेकांशी केलेले आर्थिक व्यवहार व सर्व आरोपीतांचे संपर्क क्रमांक यावरून या गुन्ह्यात चार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील आरोपी यांना पकडण्यासाठी दोन पथके वपोनि. सुनिल शिंदे, सपोनि. हर्षल कदम व पथक तसेच सपोनि. निलेश पाटील, सपोनि. आर. एम. तडवी व पथक अशी तयार करून तपास केला. यातील पथक क्र. 1 यांनी आरोपी नामे उस्मान सय्यद व शहानवाज शेख यांना सतत पाच ते सहा दिवस अहोरात्र परिश्रम करून कुर्ला व पनवेल परिसरातून शिताफीने अटक केली. तसेच पथक क्र. 2 यांनी तीन ते चार दिवस अहोरात्र आरोपी अब्दुल सलाम शेख यास जरीमरी झोपडपटटी, कुर्ला परिसरातून अटक केली आहे. दरम्यान तपास करून आरोपी यांनी चोरी केलेल्या एकुण 9 मारुती इको कार हस्तगत करून नवी मुंबई आयुक्तालय 4, मुंबई आयुक्तालय 6 व ठाणे शहर आयुक्तालय 2 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत.