। कोलाड । प्रतिनिधी ।
कोलाड-भिरा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यात मुख्यता मालवाहू ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडतच आहे. अशातच शनिवारी (दि.15) सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास एक मालवाहू ट्रेलर कोलाड भिरा-मार्गाने कोलाडच्या दिशेने येत होता. दरम्यान हसकर वाडी ते चिंचवली गावाच्या हद्दीत आला असता वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रेलर पलटी झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्नील निलेकर करीत आहेत.







