मोदी सरकार मांडणार विधेयक
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे मागे घेण्यासोबत खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी यासह 26 विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये अमली पदार्थ अल्पप्रमाणात बाळगणे हा गुन्हा मानला जाणार नाही, अशा तरतुदीचे नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, 2021 या विधेयकाचाही समावेश असणार आहे.
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर ही मागणी पुढे आली होती. माध्यमांच्या वृत्तांनुसार, 10 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता.
या बैठकीला महसूल विभाग, गृह विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. या कायद्यामुळे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळेल, असे सरकारचे मत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को विधेयकात एखाद्या व्यक्तीने ड्रग्ज बाळगणे, खाजगीरित्या सेवन करणे आणि विक्री करणे यात फरक केला जाईल. यामध्ये विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल, पण अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे हे गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढले जाईल.
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, ड्रग्जसंदर्भातील अपराध हे तर्कसंगत ड्रग्ज धोरणाकडे वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे जे शिक्षा आणि कारावासाच्या आधी विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य विचारात घेते. दरम्यान, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्यासह एकूण 26 विधेयके संसदेत मांडण्यास मान्यता दिली जाऊ शकते. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती आणि आता यासाठी संसदेत विधेयक मांडले जाणार आहे.
एक वर्षापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपवण्याच्या दिशेने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, आताही एमएसपी हमी कायद्यासह सहा मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.