निजामपूरला दूषित पाणी पुरवठा प्रकरणी पोस्कोवर गुन्हा

आ.जयंत पाटील यांच्या प्रश्‍नांवर सरकारची माहिती

। मुंबई । प्रतिनिधी ।

रासायनिक द्रव्य टाकून माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरात पाणी पुरवठा दुषित केल्याप्रकरणी पोस्को कंपनीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबतचा मुळ प्रश्‍न शेकापचे आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असे म्हटले की, तासगाव येथे पोस्को कंपनी अनधिकृतपणे टँकरद्वारे केमिकल सदृष्य द्रव पदार्थ समोरच्या मोकळ्या जागेत रिकामा करत होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कंपनीविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले.

निजामपूर शहराला होणारा पाणीपुरवठा काळ नदीवर उभारण्यात आलेल्या पाणी योजनेतून केला जात आहे. शहराला पुरवठा केला जाणार्‍या पाण्यावर केमिकलयुक्त तवंग आल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याबाबत आ. जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. तसेच तासगाव येथील पोस्को स्टील कंपनी मार्फत दूषित पाणी टँकरद्वारे नदी पात्रात सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी निदशर्शास आणले.

यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी निजामपूर ग्रामपंचायतीला शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी सरकारने जलजीवन मिशनद्वारे योजना मंजूर केली असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या महसूली गावांना करण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या नमून्याची वेळीवेळी तपासणी केली असता ते पाणी पिण्यास अपायकारक नसल्याचे आढळून आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जलजीवन मिशन अंतर्गत नळ पुरवठा योजनेचे 189.87 लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. यामध्ये नवीन विहीर पंप व जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. मार्च 2023 अखेर पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगिले.

Exit mobile version