Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा

जे.जे. रुग्णालयातील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा अहवाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. प्रियल रवींद्र शेंडे यांच्याविरोधात अखेर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालात डॉ. शेंडे यांच्यावर कर्तव्यावर हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बेलोशी येथील सुष्मिता रुपेश काटले यांना 14 मे 2022 रोजी प्रसूतीसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीच्या वेळी त्रास वाढल्यानंतर ऑनड्युटी डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, डॉ. प्रियल शेंडे रुग्णालयात उपस्थित नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बाळाचे डोके प्रसूतीमार्गात अडकल्यानंतरही वेळेत आवश्यक उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे सुष्मिता काटले यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात 2022 मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय कागदपत्रे तज्ज्ञ समितीकडून तपासून घेण्यासाठी सर जे.जे. रुग्णालयाकडे पाठविली होती. 27 जुलै 2026 रोजी समितीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. अहवालाच्या आधारे डॉ. प्रियल शेंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या अहवालाने प्रकरणाला कलाटणी
तज्ज्ञ समितीच्या अहवालात प्रसूतीच्या वेळी कर्तव्यावर उपस्थित राहणे आवश्यक असतानाही डॉ. शेंडे गैरहजर राहिल्याचे आणि त्यामुळे आवश्यक उपचार वेळेत न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डॉ. प्रियल शेंडे यांच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही चूक नसताना मला माझे बाळ गमवावे लागले. माझ्यासारख्या इतर मातांनाही अशा प्रकारच्या हलगर्जीपणाचा फटका बसू नये. माझे बाळ मला परत मिळणार नाही; मात्र या प्रकरणात कारवाई होण्यासाठी मदत केल्याबद्दल जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, अलिबाग पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मी मनापासून आभार मानते. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये शासनाने कठोर कायदे करणे गरजेचे आहे.

सुष्मिता काटले,
पीडित माता

जन्माच्या अगोदरच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक कोवळ्या जीवांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडत आहेत. सर्वसामान्यांच्या बालकांच्या जीवाला किंमत नाही का? शासनाने या गंभीर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ॲड. राकेश नारायण पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version