| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील अवैध सावकारीचा फास अखेर पोलिसांनी आवळला असून, प्रसिद्ध उद्योजक असणाऱ्या पितापुत्राविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार खात्याने अवैध सावकारीची दखल घेत पोलिसात तक्रार दाखल करताच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक झालेली नसून, राजकीय दबावापुढे त्यांना अटक होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
पेण येथील उद्योजक तथा हॉटेल व्यावसायिक सुरेशशेठ उर्फ सूर्यकांत जोमा पाटील हे अवैधरित्या सावकारी करत असल्याचा आरोप त्यांची सून प्रज्ञा हिने पत्रकार परिषद घेऊन दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. परंतु, याबाबीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. मात्र, 18 जुलै रोजी एलसीपीकडून सूर्यकांत पाटील आणि त्यांचा मुलगा भरत पाटील यांच्या गोमांतक हॉटेल व आमंत्रण सोसायटीचा प्लॅट नंबर 301, 302 यावर छाप टाकला असता, या छाप्यामध्ये पोलिसांच्या हाती विविध बँकांचे रकमा भरलेले व तसेच कोरे धनादेश, विविध मालमत्तांचे करारनामे, वचन पावत्या, खरेदीखत, गावनकाशे यासंह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. पूर्ण झाडाझडती झाल्यानंतर पोलिसांनी सर्व माहिती सहाय्यक निबंधक सहकार सुभाष काळे यांच्याकडे दिली होती. या सर्व बाबींची सुभाष काळे यांनी पडताळणी करुन 21 जुलै रोजी सायंकाळी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तो गुन्हा 22 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी दाखल झाला. पूर्ण रात्रभर या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावरुन पोलिसांच्या हाती आणि सहकार निबंधकांच्या हाती लागलेली माहिती अथवा कागदपत्रे केवढी असतील याविषयी अंदाजही बांधता येणार नाही.
सहाय्यक निबंधक सुभाष काळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत जोमा पाटील व भरत सूर्यकांत पाटील यांच्याविरुद्ध वेगवेगळे दोन गुन्हे नोंदले गेले. एकंदरीत, सफेद कपड्यांच्या आतून समाजसेवा करण्याचा पांघरूण घेतलेल्या सूर्यकांत जोमा पाटील व भरत सूर्यकांत पाटील यांचा खरा चेहरा सहकार खात्याने गुन्हा नोंदल्याने समोर आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे करत आहेत. मात्र, या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक झाली नाही. परंतु, आरोपींना अटक होईल की नाही, याबाबत निश्चित माहिती नाही.






