विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

खारघर, सेक्टर-13 भागात राहणाऱ्या 25 वर्षीय विवाहितेने पती आणि सासरकडील मंडळींच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच या विवाहितेचा विवाह झाला होता. खारघर पोलिसांनी या प्रकरणी मृत विवाहितेचा पती निरर्ज जैस्वाल, सासू संगिता जैस्वाल, दिर पंकज जैस्वाल आणि नणंद ममता जयस्वाल या सर्वांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत विवाहितेचे नाव करिष्मा निरज जैस्वाल (25) असे असून, तिचे लग्न 26 जुलै 2024 रोजी निरज पवनकुमार जैस्वाल (30) याच्यासोबत झाले होते. करिष्माच्या आई-वडिलांनी लग्नात 7 तोळे सोने आणि 1 लाख रुपये रोख स्वरुपात दिले होते. मात्र, लग्नानंतर करिष्माला तिच्या सासरकडील मंडळीकडून वारंवार हुंडा, अधिक सोने आणि भांड्यांच्या मागणींसाठी त्रास देण्यात येत होता. करिष्माची सासू तिला सतत टोमणे मारत होती. तसेच तुझ्या आई-वडिलांनी जे कबूल केले होते, ते अजून दिले नाही, असे वारंवार बोलून तिला मानसिक त्रास देत होती. तसेच करिष्माला पतीसोबत रहायचे असल्यास माहेरकडून पैसे आणण्याची अट घातली जात होती. या काळात पती निरज याने करिष्माच्या भावाकडून वेळोवेळी पैसे देखील मागून घेतले होते.

निरज याचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे करिश्माला समजले होते. त्यासंदर्भातील चॅटस्‌‍‍ तिने आपल्या भावाला पाठवले होते, पती आणि सासरकडील मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे करिष्मा मानसिक तणावात होती. त्यामुळे करिष्माच्या वडिलांचाही याच तणावामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोपी मृत करिष्माच्या आईने आपल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, पती आणि सासरकडील मंडळींच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळलेल्या करिष्माने 29 जुलै रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला संपर्क साधून आता जगावेसे वाटत नसल्याचे तसेच काहीतरी करुन घेण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावेळी आईने तिची समजूत काढून तिला घेण्यासाठी गाडी घेऊन येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच करिष्माने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृत करिष्माची आई शिवकन्या जैस्वाल यांनी करिष्माच्या आत्महत्येस पती निरज, सासू संगिता, दिर पंकज आणि नणंद ममता जैस्वाल जबाबदार असल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच करिष्माचा छळ करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

Exit mobile version