। मुंबई । वृत्तसंस्था ।
विराट कोहलीच्या मालकीच्या रेस्टॉरंट वन 8 विरोधात बंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सध्या विराट कोहली लंडनमध्ये आहे. टी-20 विश्वचषक विजयाचा मुंबईत कार्यक्रम झाल्यानंतर विराट कोहली लगेच लंडनसाठी रवाना झाला. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सेंट्रल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली, आम्हाला काल रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा सुरू असणारे सुमारे 3-4 पब आढळले आहेत. मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असे त्यांनी सांगितले.
एमजी रोडवर असलेला विराट कोहलीच्या मालकीचे वन 8 हे रेस्टॉरंट चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमजवळ आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराटच्या या रेस्टॉरंटबरोबर त्या परिसरातील इतरही काही पब आणि रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. 6 जुलै रोजी विराटच्या मालकीचे रेस्टॉरंट हे बंद करण्याच्या नियोजित वेळेच्या 20 मिनिटांनंतर म्हणजेच पहाटे 1.20 वाजताही खुले असल्याचे आढळले. दरम्यान, वेळेचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.







