सिनर्जीया केम इंडस्ट्रीजमधील स्फोटप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

| महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक सी-57 येथील सिनर्जीया केम इंडस्ट्रीज कंपनीत दोन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी कंपनीतील नऊ जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्फोटात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, कंपनीचे तसेच परिसरातील अन्य कंपन्यांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील महत्त्वाचे सेफ्टी मॅनेजरचे पद रिक्त असतानाही ते न भरता अप्रशिक्षित कामगारांकडून धोकादायक यंत्रणा व पदार्थ हाताळण्याचे काम करून घेतल्याचा आरोप आहे. कामगारांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे रियाक्टरमध्ये आग लागून त्यानंतर स्फोट झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, स्फोटामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तसेच स्फोटाचा फटका आजूबाजूच्या कंपन्यांनाही बसल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजर, सुपरवायझर, ऑपरेटर तसेच इतर कामगार अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अनिष मदनमोहन राय (प्रोडक्शन मॅनेजर), रा. सोमजार्ड मंदिर, ता. महाड, जि. रायगड, यश गणेश निवग्णे (सुपरवायझर), रा. नातेखिंड, नितीन लक्ष्मण लाड (ऑपरेटर), रा. वरंडोली, ता. महाड, जि. रायगड, अफसर हसेन, रा. बरान्डा, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, महमद नासीर, रा. धुलखोरा, पो. लखोरा, मथीहारी, पूर्वी चंपारण, बिहार, मकश राजवंशी, रा. मनोकपुरा, नवादा, बिहार, विठ्ठल तुकाराम खेडेकर, रा. कनगुले, ता. पोलादपूर, प्रदिम राम, रा. कप्रीनगर, नवादा, बिहार, विवेक लक्ष्मण पड्याल, रा. दासगाव, ता. महाड या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत रावडे करीत आहेत.

Exit mobile version