। पनवेल । प्रतिनिधी ।
कांद्याची ऑर्डर देऊन चांगले पैसे कमवून देतो, असे आमिष दाखवून 26 लाख 24 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पियूष गोहेल आणि नेहा पियूष गोहेल (रा. गांधीधाम, गुजरात) यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविता राहुल खैरनार या आसूडगाव येथे राहतात. त्यांचा शेतीमाल ट्रेडिंगचा एक्सपोर्ट-इम्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांना फोनवरून, ई-मेलवरून भारतातून व परदेशातून शेतीमाल कांदा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या ऑर्डर येत असतात. त्यामुळे त्या कांदा सप्लाय करतात. 2020 मध्ये त्यांना पियूष गोहेल यांचा फोन आला आणि त्यांची पत्नी नेहा गोहेल हिच्या नावे कंपनी असल्याचे सांगितले व कांदा योग्य किमतीत द्या, असे सांगून त्यांना फोटो, व्हिडीओ पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडून रोख पैसे देऊन 2023 मध्ये पियूष आणि नेहा यांनी कांद्याची ऑर्डर दिली. त्यांना कंटेनरमध्ये कांदा भरून पावती देऊन कांदा खरेदी केला. त्यानंतर त्यांनी ऑर्डरचे पैसे बँकेत रोख स्वरुपात दिले. मात्र, पुन्हा उधारीवर माल द्यावा लागेल आणि तुमचे पैसे एक महिन्यात परत करतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून खैरनार यांनी मे 2023 मध्ये तब्बल 26 लाख 24 हजार 277 रुपयांचा कांदा दिला. एक महिन्यानंतर सविता यांनी त्यांच्याकडे कांद्याच्या पैशांची मागणी केली असता, त्यांनी पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी खैरनार यांना धमकी दिली. या प्रकरणी सविता खैरनार यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.






