वर्षभरापासून शाळकरी मुलीचा पाठलाग

पालकांच्या तक्रारीनंतर पोक्सोंतर्गत गुन्हा

| पनवेल | प्रतिनिधी |

शाळकरी मुलीचा गेल्या वर्षभरापासून पाठलाग करून मोबाईलवरून त्रास देणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. शाळेत जात असताना मुलीला रस्त्यात अडवून कानाखाली मारल्यानंतर तिचा रिक्षातून पाठलाग केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. उमेश प्रगणे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो सुकापूर येथील भगतवाडी परिसरात राहतो.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 पासून उमेशने इंस्टाग्रामच्या माध्यमातून शाळकरी मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलीने प्रतिसाद न दिल्याने त्याने तिचा पाठलाग करणे तसेच तिचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलीने त्याला इंस्टाग्रामवर अवरोधित केले. यानंतरही उमेशने मुलीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून त्रास देणे सुरूच ठेवले. तसेच तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ व अश्लील संदेश पाठविण्यासोबतच शाळेत येऊन मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 8) सकाळी पावणेसातच्या सुमारास मुलगी शाळेत जात असताना सुकापूर येथून गोकुळधाम सोसायटीसमोरील तपोवन रिक्षा थांब्यावर उमेशने तिला अडवले. मुलीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या कानाखाली मारली. त्यानंतर मुलगी रिक्षातून पुढे जात असतानाही त्याने रिक्षातून तिचा पाठलाग केला.

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीच्या पालकांनी तातडीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.जी. घागरे यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत उमेशला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान उमेशने आरोप नाकारले. मात्र, तो वारंवार मुलीच्या घराजवळ आणि शाळेत जाणाऱ्या मार्गावर का दिसत होता, याबाबत विचारणा केली असता तो दारू पिण्यासाठी त्या परिसरात जात असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. उमेश हा फॅब्रिकेशनच्या दुकानात काम करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version