| मुलुंड | वार्ताहर |
मुलुंडमध्ये महावितरणने शोध मोहिमेत एका औद्योगिक ग्राहकाची 43 लाख रुपयाची वीज चोरी उघडकीस आणली. सदर ग्राहकाने मीटर मध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून वीज चोरी केली होती. मुलुंड विभागाने मागील सहा महिन्यात तब्बल 1 कोटी 88 लाख रुपयांची वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणने मुलुंडमध्ये शोधून काढलेली ही मागील काही वर्षातील वीजचोरीची सर्वात मोठी कारवाई आहे.विशेष म्हणजे या वीजचोरी मध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजचोरीचा समावेश आहे.
या मोहिमेदरम्यान महावितरणच्या अधिकार्यांनी 106 प्रकरणामध्ये ऐकूण विविध वीज चोरांकडून 1 कोटी 88 लाख रु. वसूल करण्यात आले आहेत. मुलुंड महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणने आतापर्यंत तब्बल 400 हून अधिक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत जेथे वीजचोरी होण्याची शक्यता होती. अभियंत्यांच्या माहितीवर आधारित कारवाई करत वीजचोरीचा आकडा दीड कोटीच्या पुढे गेला आहे. महावितरणने आतापर्यंत 1 कोटी 88 लाख रुपयांची वीजचोरीची रक्कम चोरट्यांकडून वसूल केली आहे. महावितरणच्या मुलुंड विभागातील अधिकारी पासून जनमित्रापर्यंतचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.
ही संपूर्ण मोहीम महावितरणच्या मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.