। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड शहराजवळील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या एकदरा पुलावर रोज मोकाट उनाड गुरे उभी राहत असल्याने वाहनांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत असून सातत्याने कोंडी होत आहे. विशेष करून सायंकाळी ही गुरे पुलावर घोळक्याने येऊन ठिय्या ठोकून बसत असल्याने अनेक वाहनचालक आणि पादचार्याना त्रास होत आहे. कोणतीही शासकीय यंत्रणेने यावर कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचे येथील नागरीक सांगत आहेत.
एकदरा पुलावर रात्री दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधार पसरलेला असतो. रात्रीच्या वेळी पायी चालणार्या पादचार्यांना बसलेल्या गुरांचा धक्का लागून अपघात होत असतात. या गुरांना कितीही हाकलले तरी हलत नाहीत.पूर्वी अश्या मोकाट गुरांना नगरपरिषदेकडून पकडून कोंडवाड्यात टाकले जात असे. आता कोंडवाडे नाहीत आणि उपाययोजना करणारी यंत्रणा देखील नसल्याने रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था झाली आहे. जेव्हा या मोकाट गुरांची झुंज लागते तेव्हा पादचारी जखमी व वाहनांचे देखील नुकसान होत असते. असे प्रकार यापूर्वी अनेकदा झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे.