प्राण्यांच्या पुनर्वसनाला गोशाळा चालकांचा विरोध

प्राण्यांचे पुनर्वसन इतरत्र करण्याची मागणी
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
सिडकोने आसूडगाव येथील एनएमएमटी बस डेपो शेजारील 4 हजार 500 मीटरचा भूखंड प्राण्यांचे पुनर्वसनासाठी निश्‍चित केला आहे. सध्या येथे गोवर्धन गोशाळा संस्थेतर्फे भटक्या व आजारी गायींना मोठ्या संख्येने आधार दिला जातो. येथे 300 हुन अधिक गायी आहेत. सिडकोच्या या निर्णयाला गोशाळा चालवणार्‍या संस्थेने विरोध दर्शवला आहे. गेली 15 ते 20 वर्षे आमची संस्था या ठिकाणी गोशाळा चालवत असल्याने येथील गायी आम्ही न्यायच्या कुठे, हा प्रश्‍न संस्थेकडून विचारला जात आहे. सिडकोच्या अधिकार्‍यांनी 30 मे रोजी गोशाळा येथे येऊन पाहणी केली. यावेळी सिडकोच्या भूमिकेला संस्थाचालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे.
एनएमएमटी बस डेपो जवळील आसूडगावात सुरू असलेल्या गोशाळेच्या जागेत प्राण्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र गोवर्धन गोशाळेच्या चालकांनी सिडकोच्या या निर्णयाला विरोध केला आहे. सिडकोने पोदी येथे सुरू असलेल्या कुत्रा नसबंदी केंद्राच्या बाजूला प्राण्यांचे पुनर्वसन करावे, तसेच आसूडगाव येथील या जागेत गाईंची सेवा केली जात आहे. त्यामुळे येथे इतर प्राण्यांचे पुनर्वसन करू नये आणि जर सिडकोने जबरदस्तीने हा भूखंड घेण्याचा प्रयत्न केला तर गाईंसाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा अरुण गोरे यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव जमदाडे, गुरुनाथ भोपी, विश्‍वनाथ पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Exit mobile version