नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृहात शिरकाव
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन बसस्थानक परिसरात मोकाट घोडे व गुरांचा मुक्त संचार प्रवासी वर्गाला त्रासदायक ठरत आहे. एसटी चालकाला ही बस स्थानकातून गाडी बाहेर काढताना मोठी कसरत करीत गाडी मार्गस्थ करावी लागत आहे.
बसस्थानकातून पहाटे चार वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अनेक लांब पल्ल्यांच्या तसेच स्थानिक फेऱ्या सुरू असतात. तालुक्याचे मुख्यालय श्रीवर्धन असल्याने बहुतांश नागरीक एसटीचा आधार घेत येथे ये-जा करीत असतात, त्याचप्रमाणे शहरात शाळा, महाविद्यालय असल्यामुळे शहराबाहेरील विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. शहराबाहेरील प्रवासीवर्ग, विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक प्रवाशांना बसस्थानकात येणे जाणे एक समस्या झाली आहे.
बसस्थानक इमारतीतील वाहतूक नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह या परिसरात घोडे, गुराढोरांचा मुक्त संचारामुळे प्रवासी भयभीत होतात. अनेकदा बसस्थानकातील ऑन ड्युटी असलेले कर्मचारी घोडे, ढोरांना हुसकावून लावताना दिसतात. बहुतेक वेळा नैसर्गिक विधी ही बसस्थानकाच्या इमारतीत करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. अनेकदा स्थानकातून मार्गस्थ करताना चालकाला गाडी बंद करीत ढोरांना हुसकावून देण्याची ड्युटी करावी लागते.







