दोन बैलांचा होरपळून मृत्यू
| महाड | प्रतिनिधी |
विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लागलेल्या आगीमध्ये शेतकर्याच्या वाड्यासहित दोन बैल होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील रावडळ येथे घडली. यामध्ये शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
महाड तालुक्यातील चंद्रकांत मांडवकर हे रावढळ यांच्या शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. दुपारच्या सुमारास विद्युत खांबावरील चालू विद्युत वाहिनी तुटून त्यातून बाहेर पडलेल्या ठिणग्या गवत आणि वाड्यावर उडाल्याने आग लागली. या घटनेत चंद्रकांत मांडवकर यांचा वाडा पूर्णपणे जळून खाक झाला, तर या वाड्यामधील दोन बैल आगीच्या भक्षस्थानी पडले. नांगराचे दोन्ही बैल या आगीमध्ये जळून खाक झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेचे वृत्त समजतात महाड महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली आहे.