| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे गावाच्या हद्दीमध्ये सोमवारी (दि.14) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण वनवा लागला, त्या वनव्यामध्ये चार गुरे दागावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रानबाजिरे गावच्या हद्दीमध्ये भीषण वनवा लागला होता. या भीषण वणव्यामुळे तालुक्यातील रानबाजिरे येथील शेतकरी सूर्यकांत नथुराम सावंत यांचा गुरांचा गोठा जळून खाक झाला असून, चार गुरे दगावली आहेत. यामध्ये एक गाय, दोन बैल व एक वासरू यांचा समावेश आहे. तर एक गाय बचावली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व सर्व सदस्यानी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अगीची भीषणता इतकी होती की गावाच्या नजीक असलेल्या घरांना देखील धोका निर्माण झाला होता. या दुर्देवी घटनेमुळे शेतकरी सावंत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना शासनाची मदत व्हावी अशी मागणी जोर धरतं आहे. यावेळी तहसील कार्यालयातील आपत्ती सहाय्यक परशुराम पाटील तलाठी सुनील वैराळे व कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते.