तळावासियांमध्ये घबराट
| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची गुरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील तळेगांव येथील नागरिकांची गुरे चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
आतापर्यंत तळेगांव येथील साधारणपणे 25 गुरे चोरीला गेली आहेत. याआधी देखील वडाची वाडी व कासेवाडी येथील नागरिकांची गुरे चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु आपली गुरे भरकटली असतील आज ना उद्या ती परत येतील या आशेमुळे नागरिकांनी तक्रार दाखल करणे टाळले होते. मात्र त्यावेळी एका शेतकर्याने गुरे चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हळूहळू इतरही गावातील शेतकरी आमची गुरे चोरीला गेली असल्याचे सांगताना दिसत होते. ही गुरे कोण व कशासाठी चोरी करीत असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु गावातील ग्रामस्थांनी आपली गुरे विक्री करणे बंद केल्याने गुरे चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय एवढं मात्र नक्की.
यासाठी संबंधित शेतकरी देखील तेवढेच जबाबदार आहेत. कारण बहुतांश शेतकरी हे आपल्या गुरांचा वापर कामापूरता करतात व काम झालं की त्यांना मोकाट सोडून देतात. यामुळे पाळत ठेऊन असलेल्या गुरे चोरणार्या टोळीला गुरे चोरणे सोपे होऊन जाते. त्यामुळे शेतकर्यांनी देखील आपली गुरे मोकाट न सोडता व्यवस्थित गोठ्यात बांधून ठेवली तर गुरे चोरीला आळा बसेल.आता ही गुरांची चोरी रोखण्यासाठी पोलीस कोणती उपाययोजना करतात व त्यामध्ये त्यांना किती यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.