पालीत गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

| पाली/वाघोशी | वार्ताहर |

पाली सुधागड येथे गुरे चोरी करण्याची घटना नुकताच घडली. मात्र, स्थानिकांच्या प्रयत्नाने तात्काळ आरोपींना पाली पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश आले. सदर घटना गुरुवार, दि. 17 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास भेरव ते उन्हेरेदरम्यान घडली. निखील शाह व त्याचे मित्र ओंकार खोडागळे, अमित जाधव, सूरज गुप्ता हे उन्हेरे कुंडावर अंघोळ करण्याकरिता गेले असता. रात्री 10.30 वाजण्याचे सुमारास अंघोळीनंतर आपापल्या घरी जाण्याकरिता निघाले असता उन्हेरे येथील मोरीजवळ पालीकडून उद्धरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना एक सफेद रंगाची महेंद्रा पिकअप क्र.एम.एच.14 एच.जी.0526 ही संशयास्पदरित्या जात असताना दिसली. तिला थांबविण्यासाठी त्या पिकअपच्या मागे पाठलाग करत गेले. पिकअपला लावलेली ताडपत्री उडाल्याने त्यामध्ये गुरे कोंबलेली त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी त्या पिकअपचा पाठलाग केला. परंतु, तो पिकअप थांबला नसल्याने सदरची गुरे चोरून नेत असल्याचा संशय त्यांना आला.

सदर पिकअपचा पाठलाग केला असता पिकअप चालकाने भैरव, पो. खुरावले, ता. सुधागड येथील रस्ता संपत असलेल्या ठिकाणी पिकअप थांबविला. त्यावेळी पिकमधील चालक व त्याच्यासोबत असणारे इसम गाडीमधून पलायन करत असताना त्यांना पकडण्यात आले. यावेळी पिकअपची पाहणी केली असता चार गुरे कोंबलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांना टेम्पोचालकासह तीन इसम, पिकअप व त्यातील जनावरे पोलिसांच्या ताब्यात दिली. सदर आरोपी रोहा येथील राहणारे आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version