कर्जतमध्ये गुरे चोरीला

| कर्जत | वार्ताहर | कर्जतमधील शेतकर्‍याचा एक गिर जातीचा बैल आणि चार गायी रात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पळवून नेले. या चोरीमुळे शेतकर्‍याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे प्रकार नेहमीच घडत आहेत. पोलिसांकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कोषाणे गावचे शेतकरी हरिश्‍चंद्र तातू ठोंबरे यांची बारा गुरे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गुरचारणीमध्ये गेले होते. त्यातील सहा गुरे पहाटेच्या सुमारास घरी आली. पहाटेच्या सुमारास ठोंबरे दूध काढण्यासाठी गोठयात आले असता त्यांना उर्वरित सहा गुरे दिसली नाहीत. ते ती गुरे शोधण्यासाठी कर्जत-कल्याण रस्त्यावर आले असता त्यांना एक गाय रस्त्यावर बसलेली दिसली. त्यांनी तिला कसेतरी उठवले व गोठ्यात आणले. ती अगदी गर्भगळीत झाली होती. सकाळी डॉक्टरांना बोलवून गाईची तपासणी केली तेंव्हा तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तपासणी केलेल्या डॉ. के. के. सलगर यांनी सांगितले. तसा दाखला सुद्धा त्यांनी दिला. हा दाखला घेऊन ठोंबरे यांचा मुलगा पोलीस पाटलांबरोबर तक्रार नोंदविण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात गेले असता तेथे असलेल्या ठाणे अंमलदाराने तक्रार न घेता उलट त्यालाच चार शब्द सुनावले. दुसर्‍या दिवशी हरिश्‍चंद्र ठोंबरे यांनी वरई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष फराट यांच्या सह त्या दिवशीच्या ठाणे अंमलदारांची भेट घेऊन तक्रार घेण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तुम्ही त्या परिसरातील सीसी टीव्ही फुटेज आम्हाला द्या, असे सांगितले. यावर वैतागून ठोंबरे यांनी पोलीस ठाण्याच्या नाद सोडला. त्यांच्यावर गप्प बसण्यावाचून गत्यंतर नव्हते. मात्र, पोलीस ठाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version