गुन्हेगारांवर कडक शासन करण्याची गरज
| म्हसळा | प्रतिनिधी |
तालुक्यात गुरे चोरीच्या आणि बिबट्याने शिकार करण्याच्या घटनांत वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वर्षभरात म्हसळ्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेकडो गुरे चोरीला गेली असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरुन सांगण्यात आले.
म्हसळा येथील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी मोहम्मद म्हसलाई यांची दुभती गाय चरण्यास गेली असता ती शोध घेऊनही गोठ्यात परत आली नाही. गाय चोरीला गेली असल्याची खात्री झाल्याने म्हसलाई यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गाय चोरीला गेल्याचे घटनेला 13 दिवस उलटून गेले आहेत. म्हसळा पोलिसांनी गोधन चोरी व गोहत्येबाबत अनेक घटनांत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. गोधन चोरी करणे व गो हत्या करणे कायद्याने बंदी असताना अशा घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारचे गुन्हेगारांवर कारवाईचा कडक बडगा उचलून त्यांना कडक शासन झाले पाहिजे. शासनाने कायद्यात बदल करून तसा निर्णय घेतला तर गुन्हेगारीवर कायमचा आला बसेल, असे जाणकारांचे मत आहे.







