कत्तलीसाठी आठ जनावरे नेणारा टेम्पो पकडला; दोघे अटक

। महाड । प्रतिनिधी ।
कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून आणलेल्या आठ जनावरांची टेम्पोतून वाहतूक करणार्‍या दोघांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्याकडून आठ बैल ,एक टेम्पो व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली येथे 12 एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली.
अब्रार सज्जाद खान (वय 54 रा. गोवंडी मुंबई )व समीर अशोक पवार (रा.लाडवली महाड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर एका टेम्पो ची तपासणी केली असता त्यामध्ये आठ बैल कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले .या जनावरांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय वाहनात करण्यात आलेली नव्हती तसेच जनावरांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नव्हती. हे आठ बैल चोरून आणण्यात आलेले होते. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी टेम्पो चालक व त्या सोबत असणार्‍या त्याच्या सहकार्‍याला अटक केली आहे. या टेम्पोतून वाहतूक होत असणारे प्रत्येकी आठ हजार रुपये किमतीचे आठ बैल, पाच लाख रुपयांचा टेम्पो व पाच हजार रुपयांचा मोबाईल असा सुमारे 5 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुशील पाटेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम , भादवि कलम 379 (34) व मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version