| रायगड| जिल्हा प्रतिनिधी |
रायगडमध्ये 40 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्तासह तीन जणांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक आणि खासगी व्यक्तीचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विनय कुमार कांठेती, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ, यांचा समावेश आहे. तसेच राकेश कुमार सिन्हा, अधीक्षक, जीएसटी, रायगड यांनाही अटक केली आहे. या प्रकरणात खासगी व्यक्ती नरेंद्र राजपूत यालाही अटक करण्यात आली आहे.तक्रारदाराच्या दगड उत्खनन कंपनीच्या जीएसटी/रॉयल्टी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुरुवातीला 1.50 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर लाचेची रक्कम 40 लाख रुपयांवर आणण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लाचेची रक्कम खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारण्याची व्यवस्था केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. सीबीआयने सापळा रचून नरेंद्र राजपूत याला 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम स्वीकारल्याचे राकेश कुमार सिन्हा आणि विनय कुमार कांठेती यांनी कबूली दिल्याची माहिती देण्यात आली. सीबीआयने तिघांनाही तात्काळ ताब्यात घेतले. आरोपींच्या विविध ठिकाणांवर करण्यात आलेल्या झडतीत 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सुमारे 90 लाख रुपयांचे दागिनेही आढळून आले आहेत. ते जप्त केले आहेत. तिन्ही आरोपींना अटक करून सक्षम न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या लाचखोरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास सीबीआय करीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.
