। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या घरी सीबीआय पथक दाखल झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनिल देशमुख सहकुटुंब गायब असून त्याबाबत कोणलाही काहीच कल्पना नसल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसेच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.
याप्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली होती. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. काही महिन्यांपूर्वी सीबीआयने देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजरही राहिले होते.