| पेण | प्रतिनिधी |
एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीच्या कोनायन्सन स्कूलमध्ये सीबीसी अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण महर्षी बापुसाहेब नेने यांच्या हस्ते झाले. साधारणतः सहा वर्षांपूर्वी नर्सरी ते दहावी हे वर्ग कोनायन्सन स्कूलने सुरू केले. सुरूवातीच्या वर्षी 80 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली शाळा अल्पावधीतच पालकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे पालकांच्या आग्रहाखातीर एनव्हीजी सोसायटीने कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता आणून कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात गुरुवारी धूमधडाक्यात केली.
सर्वप्रथम प्रमुख अतिथी शिक्षणमहर्षी बापुसाहेब नेने यांचे स्वागत शाळेच्या बॅड पथकाकडून करण्यात आले. त्यानंतर सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि नंतर बापूसाहेबांच्या हस्ते फीत कापून अकरावीच्या वर्गाचे औपचारीक उद्घाटन केले. या शिक्षण सोसायटीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्टस या तिन्ही शाखांचे अकरावीचे प्रवेश सुरू झाले आहेत आणि एक तारखेपासून हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहे.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पेण एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर शिक्षणमहर्षी बापुसाहेब नेने, मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील, बापूसाहेब आठवले, बोरगाव मा. सरपंच नाना महाडिक, मा. उपनगराध्यक्ष दिपक गुरव, संचालक मंडळापैकी अध्यक्ष डॉ. मनिष वनगे, उपाध्यक्ष डॉ. सोनाली वनगे, सचिव ॲड. मंगेश नेने, खजिनदार ज्योती गुरव यांच्यासह मुख्याध्यापिका सुप्रिया वेखंडकर, जमिना शिरपुरवाला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमिना शिरपुरवाला यांनी केले. यावेळी बापुसाहेब नेने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. परंतु, त्याबरोबर इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्रातून 9 ते 10 टक्के विद्यार्थी परदेशात जातात, तिथे तर ते मराठी बोलू शकत नाही. तिथे इंग्रजीचाच उपयोग होतो. त्यामुळे इंग्रजी माध्यमांची शाळा ही काळाची गरज होऊन बसली आहे. तसेच यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, ॲड. मंगेश नेने, डॉ. सोनाली वनगे, डॉ. मनिष वनगे, डॉ. नीता कदम, मा. सरपंच नाना महाडीक यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. रायगड जिल्ह्यात प्रथमच सीबीएससी अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीने केली आहे.
सीबीएससी कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात
