काशिद समुद्रकिनार्‍यावर ‘तिसरा डोळा’

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
रायगड पोलिसांकडून विविध उपाययोजना

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रावर आता सीसीटीव्ही नजर असणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे पर्यटकांची सुरक्षा तर करता येणार आहेच, शिवाय आगाऊ पर्यटकांवर कारवाईदेखील याचा उपयोग होणार आहे. पर्यटकांची संख्या वाढावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या.

मुरुड तालुका पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातुन लाखो पर्यटक ये-जा करिता असतात. परंतु, काही पर्यटकांच्या आततायीपणामुळे मुरुड तालुक्यातील काशिद, चिकनी, मुरुड आदींसह समुद्रकिनारी पोहोत असताना आतापर्यंत 142 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सकपाळ व पोलीस नाईक सागर रसाळ यांनी काशिद, मुरुड, राजपुरी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचे पालन पर्यटकांनी केलं तर पर्यटक सुरक्षित राहील, असे त्यांनी सांगितले.


दुर्घटना टाळण्यासाठी
पाण्याचा अंदाज व भरती-ओहोटीची वेळ न पाहता पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. आणि वाईट दुर्घटना घडतात. त्या टाळण्यासाठी दोन पोलीस शिपाई याठिकाणी तैनात केले जाणार आहेत. येणार्‍या पर्यटकांचे स्वागत करुन काशिद समुद्राची नैसर्गिक रचना कशी आहे त्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल. पोहणार्‍यांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली असून, जीवरक्षकांना याबाबत आधी माहिती द्यावी लागणार आहे.



पोलिसांकडून जनजागृती
पर्यटक किंवा शालेय विद्यार्थी/शिक्षकांची सहल काशीद बीच येथे आल्यावर शाळेचे नाव, विद्यार्थी संख्या, शिक्षक, जिल्हा इत्यादी माहिती रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. सायरनच्या माध्यमातून धोक्याचा इशारा दिला जातो., लाऊड स्पीकरद्वारे पर्यटकांना सूचना दिल्या जातात. वयोवृद्ध, महिला, बालके हे गर्दी ठिकाणी हरवल्यास त्यांना लाऊस्पिकरच्या साह्याने जलद माहिती देता येते., समुद्रकिनारी व रस्त्यावर दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लाईफ गार्ड यांची करण्यात आली आहे. रेस्क्यू बोट (बचाव) करिता जेट्सकी वापर केला जातो. धोकादायक सूचना देणारी पाच फलके लावण्यात आली आहेत., बॉल, रिंग बॉय, रस्सी, लाईफ जॅकेट इत्यादी साधन सामुग्री उपलब्ध करून ठेवली आहे. वाहने पार्किंग बोर्ड लावण्यात आले आहेत., नो सेफ झोन असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

पर्यटकांची सुरक्षा हे आमचे काम आहे. परंतु, आम्ही केलेल्या उपाययोजनांकडे पर्यटकांनी काळजीपूर्वक लक्ष दिले व त्यांचे पालन केले, तर कोणतीही दुर्घटना घडणार नाही. – प्रकाश सकपाळ, पोलीस निरीक्षक, मुरुड

Exit mobile version