। ठाणे । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेने शहरात 1 हजार 730 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. परंतु, या कॅमेर्यांची देखभाल करणे पालिकेला शक्य नसल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्यामध्ये 300 कॅमेरे बंद पडले होते. त्यानंतर आणखी 113 कॅमेरे बंद पडल्याचे समोर आले आहे. कॅमेर्यांची दुरुस्ती तसेच, नवे कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे निधीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिका दुरुस्तीसाठी लागणारा 25 लाखांचा निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून नव्याने लावण्यात येणार्या 6 हजार कॅमेर्यांमध्ये हे बंद पडलेले कॅमेरे बदलून मिळावे, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. पालिकेच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने ठाणे, कळवा आणि मुंब्रा विभागात 1 हजार 730 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेर्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती ठाण्यातील हाजुरी येथे नियंत्रण कक्षात संकलित केली जाते. पण योग्य वेळेस दुरुस्ती न झाल्याने अनेक कॅमेरे बंद पडले आहेत.