सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत, खासगी सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर कारभार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
समुद्रमार्गे होणाऱ्या देशविघातक कारवाया रोखण्यासाठी मांडवा बंदरावर सुसज्ज असे टेहळणी कक्ष बांधण्यात आले आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. किनाऱ्यावरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा कक्ष दुर्लक्षीत असून त्यावर खासगी कंपन्यांचे फलक व मोबाईल टॉवर यांनी झाकून गेले आहे.
मुंबई येथील 26/11 च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी बंदरांवर टेहळणी कक्ष उभारण्यात आले. मच्छीमार, तांडेल, खलाशांशी मदत घेऊन किनाऱ्यावरील संशयित हालचालीवर लक्ष देण्यास सुरुवात केली.
रायगड जिल्हा मुंबईच्या अगदी जवळ असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ले होण्याचा धोका नाकारता येत नाही. गेटवे, भाऊचा धक्का येथून समुद्र मार्गे मांडवा बंदरावर येणाऱ्यांची संख्या हजारोच्या संख्येने आहे. जलवाहतुकीमार्गे अनेकजण प्रवास करतात. त्यामुळे मांडवा एक प्रमुख बंदर म्हणून ओळखले जात आहे.
पर्यटक व प्रवाशांच्या गर्दीचा विचार करीत या बंदराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली. 2013 मध्ये मांडवा बंदरावर सुसज्ज अशी दुमजली टेहळणी कक्षाची इमारत बांधण्यात आली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी, पर्यटकांसाठी जागा निश्चित करण्यात आली. या कक्षामध्ये पोलिसांना राहण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसचे उंच टेहळणीद्वारे किनाऱ्यांवरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांवर सोपविण्यात आले. मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची याठिकाणी नेमणूक केली जाते.
रायगड जिल्ह्यात 1992 मध्ये श्रीवर्धनमधील शेखाडी येथील सागरी किनारी आरडीएक्स सापडले होते. त्यानंतर काही महिन्यापूर्वी श्रीवर्धनमध्ये समुद्रमार्गे शस्त्रांचा साठा आढळून आला होता. अशा काळ्या घटनांनी रायगडमधील किनारे परिचित असतानाही आजही मांडवा बंदरावरील सुरक्षा बिनभरोसे असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
मांडवा बंदरावर फक्त खासगी सुरक्षकांमार्फतच किनाऱ्यांवरील संशयित हालचालीवर लक्ष दिले जात आहे. पोलीस कर्मचारी नसल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. येथील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.
टेहळणी कक्ष की जाहिरात फलकांचे खांब ?
पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या या टेहळणी कक्षावर भल्या मोठ्या खासगी कंपन्यांचे फलक बसविण्यात आले आहे. तसेच त्याठिकाणी मोबाईल टॉवर उभे आहे. या कक्षात असलेली फायर यंत्र बंद स्थितीत असून धूळ खात पडून आहे. ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. लोखंडी पायऱ्यांना गंज लागला आहे.
प्रवासी जेट्टीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
जल वाहतूकीच्या दृष्टीने मांडवा बंदर पर्यटकांसह प्रवाशांच्या सोयीसाठी सुखकर होत असताना या जेट्टीच्या दुरुस्तीकडे मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे. जेट्टीवरील पत्रे तुटले आहेत. त्यांना गंज लागलेला आहे. लोखंडी पाईप तुटलेले आहेत. त्याची दुरुस्ती करण्यास उदासीन ठरल्याने प्रवासी वर्गाकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.