जनतेच्या पैशांचा अपव्यय?; 109 ठिकाणी बसवलेले कॅमेरे तीन महिन्यांपासून बंद
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शहराच्या सुरक्षेसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून 109 ठिकाणी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप होत आहे. काही कॅमेरे दिशाहीन झाले असून, पोलीस ठाण्यातील त्यांचे मॉनिटरही बंद असल्याने एवढा मोठा खर्च करून उभारलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा हा अपव्यय नेमका कोणाच्या निष्काळजीपणामुळे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
श्रीवर्धन शहरात 2017 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या यंत्रणेचा चोरीसह विविध गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोठा फायदा होत होता. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आले होते. मात्र, 3 जून 2020 रोजी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळात कॅमेरे, खांब आणि वायरिंगचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील वाढते पर्यटन आणि सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून 109 ठिकाणी नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सुरुवातीला वर्ष ते दीड वर्ष काही प्रमाणात यंत्रणा कार्यरत होती. मात्र, काही कॅमेरे सुरुवातीपासूनच बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पोलीस ठाण्यातील मॉनिटरही बंद
शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण व फुटेज पाहण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आठ ते नऊ मॉनिटर बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या हे मॉनिटरही बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीवर्धन हे पर्यटनस्थळ असल्याने पावसाळ्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत चोरी, वाहनचोरी अथवा अन्य गुन्हे घडल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरते. मात्र, कॅमेरेच बंद असल्याने यंत्रणेवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा उपयोग काय, असा सवाल नागरिक करत आहेत.
काही कॅमेरे रस्त्याऐवजी कुंपणाकडे!
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही कॅमेरे दिशाहीन झाले असून रस्त्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी कुंपणाकडे रोखले गेले आहेत. त्यामुळे यंत्रणेची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्ती योग्य पद्धतीने केली जात नसल्याचा आरोप होत आहे. सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाच्या दर्जाबाबतही नागरिकांमध्ये चर्चा असून, संबंधित ठेकेदाराला राजकीय वरदहस्त असल्याच्या आरोपांचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.शहरातील नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असलेली ही यंत्रणा तातडीने सुरू करावी, बंद कॅमेरे दुरुस्त करावेत, दिशाहीन कॅमेरे योग्य दिशेने बसवावेत आणि संपूर्ण यंत्रणेची तांत्रिक तपासणी करावी, अशी जोरदार मागणी श्रीवर्धनकरांकडून होत आहे. दोन कोटी रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा धूळ खात ठेवण्याऐवजी नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
