| अलिबाग | प्रमोद जाधव |
दत्त जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेवदंडा पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेमध्ये संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी चार ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले असून एक टेहळणी कक्ष आणि पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचे काम केले जात आहे.
रेवदंडा परिसरातील चौल- भोवाळे येथे दत्तजयंती निमित्त 4 डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये भाविकांसह पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. प्रचंड गर्दी पहावायस मिळत आहे. खाद्य पदार्थांपासून घरगुती, खेळाच्या साहित्यांची दुकाने या यात्रेत उभारण्यात आली आहेत. आठ डिसेंबरपर्यंत ही यात्रा राहणार आहे.त्यामुळे या कालावधीत लाखो पर्यटक व भाविक दर्शनासाठी येणार आहेत. मागील तीन वर्षापुर्वी दत्तमंदिरात चांदीचा प्रभावळ चोरीला गेली होती. त्याचा तपास अद्याप लागला नाही. त्यामुळे यंदा यात्रेमध्ये पोलिसांनी अधिक सर्तकता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी एक टेहळणी कक्ष व एक पोलीस मदत कक्ष बांधण्यात आले आहे. 21 ठिकाणी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोज 40 हून अधिक पोलीस त्याठिकाणी नेमण्यात आले आहेत. त्यात 30 अंमलदार सहा वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील पोलिसांनी लक्ष दिले आहे. महिला छेडछाड विरोधी पथक नेमण्यात आले आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 24 तास ही यंत्रणा तैनात राहणार असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली.
दर पाऊण तासाने एसटी बस
चौल-भोवाळेमधील यात्रेला सुरुवात झाली आहे. भाविकांना यात्रेबरोबरच दर्शनासाठी वेळेवर निश्चित पोहचता यावे यासाठी अलिबाग एसटी बस आगारामार्फत ज्यादा एसटी बस फेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. चौल यात्रा स्पेशल या बसेस आहेत. दर पाऊस तासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एसटी महामंडळाचे कक्ष असून त्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत. शेवटची बस रात्री आठ वाजता असणार असल्याचे आगाराकडून सांगण्यात आले आहे.
