| रत्नागिरी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित शिक्षक पात्रता परीक्षेची रत्नागिरी जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्ह्यात 10 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने पारदर्शक व्यवस्थेसह तयारी केली आहे.
या परीक्षेसाठी 10 केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पेपर 1 साठी 1,762 उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात जाती आहे. पेपर 2 साठी 2,589 उमेदवारांची संख्या आहे. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विशेष काळजी घेतली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याऱ्यांची बारकाईने नजर असणार आहे. यामुळे परीक्षा हॉलमधील हालचालीवर 24 तास नियंत्रण राहणार आहे. उमेदवारांच्या ओळखपत्राची खात्री करण्यासाठी केंद्रावर प्रत्येकाचे थम्ब रीडिंग घेतले जाणार आहे. यामुळे बोगस उमेदवार बसण्यास पूर्णपणे प्रतिबंध होणार आहे. परीक्षेवेळी प्रशासकीय कामकाजासाठी 350 कर्मचाऱ्यांची नियोजनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.







