कोरोना नियमांच्या संगतीत घरीच गोविंदा साजरा

। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता झिराड मधील पाटील परिवाराने अंगणातच हंडी बांधून घरातल्या घरातच दहीहंडीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला.

कोणत्याही नियमाला गालबोट लागणार नाही याचे भान ठेवून पाटील परिवाराने आपल्या घराच्या अंगणातच हंडी बांधत दहीहंडीचा आनंद लुटला. कोणत्याही प्रकारची गर्दी न करता फक्त घरातल्या सदस्यांसह हा सण साजरा केला गेला. तसेच घरातल्या बालगोपाळांनीही या सणाची पुरेपुर मजा घेतली. काहीतरी वेगळं करीत नियम पाळत व सणही साजरा करीत पाटील परिवाराने अतिशय सुंदर संदेश दिला आहे.

कोरोनामुळे सणांवर निर्बंध लागले असले तरी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत व आपल्या सणांना पूर्णविराम न देता पारंपारिक पद्धतीने ते साजरे केले गेले पाहिजेत अशी प्रतिक्रिया सचिन पाटील,स्वाती पाटील यांनी व्यक्त केली.

झिराडमध्ये गोविंदाचा उत्साह
अलिबाग तालुक्यातील झिराड मध्ये गोकुळाष्टमी व गोविंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. गोविंदा आला रे आला अशी वाजत-गाजत आनंदोत्सवात यंदाही मिरवणूक साधेपणानेच काढण्यात आली. कोरोनाचे सर्व नियम पाळत हा साध्या पद्धतीने साजरा केला.यावेळी ग्रामस्थ, बालगोपाळ सहभागी झाले होते.

Exit mobile version