प्रवाशांना गुलाब पुष्पदेऊन वर्धापन दिन साजरा

अलिबाग आगाराचा नाविन्यपूर्ण उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन शनिवारी (दि.01) अलिबाग बस आगारात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन एक आगळा वेगळया पध्दतीने हा सोहळा साजरा केला.

अलिबाग एसटी बस आगारात सकाळी रांगोळी काढण्यात आली. त्यानंतर एसटी बसला फुलांनी सजविण्यात आले. एसटी बसची पूजा करण्यात आली. ठिकठिकाणी फुलांच्या माळा लावून परिसर सुशोभीत केले. त्यानंतर अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला. यावेळी एसटीतील वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा विभागाचे अधिकारी कर्मचारी, चालक, वाहक व महिला कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला एसटीने सेवा दिली आहे. त्यामध्ये अधिकार्‍यांसह चालक, वाहक, मॅकेनिक यांची महत्वाची भुमिका ठरली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात आजही एसटी बसला प्रचंड मागणी आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी एसटीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अलिबाग एसटी बस आगारामार्फत करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अनेकांनी शुभेच्छा देत एसटीच्या कार्याची माहिती दिली.
अलिबाग आगारासह स्थानकात कर्मचार्‍यांकडून पेढे देखील वाटण्यात आले. वर्धापनदिनानिमित्त देण्यात आलेल्या गोड पदार्थ खाण्याचा आनंद प्रवाशांनी घेतला. स्थानकातील अनेक गाड्या फुलांनी सजल्याने एक उत्साह यानिमित्ताने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर पहावयास मिळाला.

Exit mobile version