उत्सव संपन्न

दरवर्षी होणारा मात्र कोरोना संकटामुळे विलंबाने आयोजलेला साहित्य आणि संस्कृतीचा सोहळा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यापूर्वी आणि सोहळा सुरू असताना आणि तो झाल्यानंतर जे काही वादविवाद, उचित अनुचित प्रकार घडायचे होते तेही घडले. निमंत्रित अनिमंत्रित आदी प्रकारांपासून राजकीय ते साहित्यिकांच्या मानापमानापर्यंतच्या घडामोडी पार्श्‍वभूमीला घडल्या. तसेच या संमेलनाला मान्यवरांच्या उपस्थितीला धरून असलेले संकेतही बाजूला पडल्याचे दिसल्याने पूर्वाध्यक्ष आणि अध्यक्ष दोघांच्या अनुपस्थितीमुळे वातावरण वेगळे झाले. त्याची कसर अध्यक्षांचे डिजिटल भाषण आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आणि भाष्यकार जावेद अख्तर यांच्या भाषणाने भरून काढली. जे कटू आहे, पण सत्य आहे, ते सांगितले, लिहिले गेले पाहिजे असा घणाघात करून त्यांनी जणू अवघ्या संमेलनासाठी साहित्यिक व वक्त्यांसाठी पूर्वपिठीका निर्माण करून दिली. ती पुढे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या समारोपापर्यंत निभावली गेली. या संमेलनाच्या आयोजनाला धरून, कोरोना तसेच आकस्मिक पावसामुळे निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती ही वेगळीच बाब होती. तशीच अनिश्‍चितता मुक्तपणे मिसळण्याबाबत अद्याप असलेली धास्ती, सामाजिक अंतर राखणे, मास्कसह वावरणे आदींच्या दृष्टीने असणारा संकोच, याविषयीही साशंकता होती. मात्र रसिकांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा सोहळा संपन्न होण्याच्या दृष्टीने मोलाची साथ दिली. केवळ लसीकरण झालेल्यांनाच दिला जाणारा प्रवेश, रोजच्या रोज शरीराचे तापमान तपासण्यासाठी उभे केलेले स्वयंसेवक, चाचणीसाठीचे केंद्र आदींमुळे सुरक्षित वातावरणाची ग्वाही होती. स्वागताध्यक्ष छगन भूजबळ यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधल्याने वेगात गोष्टी घडल्या हे खरे आहे. मात्र असे वेगात गोष्टी घडवत असताना अनेक त्रुटी निर्माण होतात आणि त्याची काळजी घ्यायचे राहून जाते. कधी आयोजनाचेच आव्हान इतके असते की साहित्याशी या प्रकाराचे काही देणे घेणे आहे हे काही वेळा दुय्यम ठरते. हे आयोजकांच्याच बाजूने होते असे नाही, तर त्यात सहभागी होणार्‍या साहित्यिक, पत्रकार आणि अन्य वक्त्यांच्या बाबतीतही घडते. विषयाची पुरेशी तयारी करण्यात मागे पडणारे वक्ते, साहित्यिक, पत्रकार यामुळेही त्रुटी राहतात. एखाद्या परिसंवादात सहभागी होण्यास आमंत्रित करण्यात येणारे मान्यवर असतात हे मान्य; मात्र त्यांनी तेथे येऊन केवळ आपली नुसती मते मांडणे अपेक्षित नसते.

या मतांसोबत अधिक खोलवर जाऊन त्या त्या विषयाला धरून अधिक दिशादर्शक असे चिंतन मांडले तर ते अधिक उद्बोधक ठरते आणि उपस्थित रसिकांना ती मेजवानी वाटते. तसे काही वक्ते आणि साहित्यिकांनी ती मेजवानी उपलब्ध करून दिली. संमेलन हे वादविवादांनी युक्त असते, अशी आपली परंपरा आहे. पहिल्याच उद्घाटनाच्या दिवशी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर या दोघांना धरून पुढील अध्यक्ष हा चालता फिरता निवडला जावा असे जाहीर वक्तव्य करून आवश्यक तो वाद सुरू करून दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तो एक प्रकारे या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचा अवमान होता. या दोघांची निवड झाली आणि ती एक सन्मानाची बाब मानली जाते. त्यांच्या असण्याने फरक पडतो, हे निश्‍चित, मात्र प्राप्त परिस्थितीत त्यांच्या अनुपस्थितीमुळे या प्रतिकात्मक पदांचे मूल्य कमी होत नाही. कारण तो मराठी साहित्याच्या रसिक जनतेने देऊ केलेला तो सन्मान असतो. आणि या 94 व्या संमेलनासह गेल्या जवळपास दीडशे वर्षांत झालेले काही संमेलनाध्यक्ष पाहिल्यास ते चालते फिरते असून काय साध्य झाले, असा प्रश्‍न पडू शकतो. मात्र अपेक्षेप्रमाणे या संमेलनात जे विविध परिसंवाद आणि चर्चा झाल्या, जी काव्यसंमेलन आणि काव्यकट्टे व गझलमंच सजले, त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ठसठशीतपणे पुढे आला, ही एक फार मोठी फलश्रुती म्हणता येईल. कारण गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीने विद्यमान सरकार स्वातंत्र्याचे गळे घोटते आहे, ते पाहिल्यास हा जोरकस उद्गार आवश्यक होता. त्याच बरोबर नाशिकच्या थंडीच्या मोसमात, एमईटीच्या नयनरम्य परिसरात एका नव्या उत्सवी वातावरणात रसिकांना न्हाऊन निघण्याची संधी मिळाली, तीही मोलाची आहे. विक्रमी पुस्तकविक्रीतून तो उत्साह व्यक्त झाला आहे.

Exit mobile version