राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

कर्जतमध्ये जनजागृती रॅली

| कर्जत | प्रतिनिधी |

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्यावतीने कर्जत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, कर्जतचे इयत्ता 11 वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी नायब तहसीलदार अंजली पांडव, मंडळ अधिकारी आप्पा राठोड, कर्जत तलाठी दत्ता ठोकळ, महसूल सहाय्यक पवन सूर्यवंशी, कोतवाल सोपान पाटील, नरेश महाडिक, धनंजय निकवाडे, अभिनवचे प्रा. प्रमोद पाटील, प्रा. सोनल सोनावणे, प्रा. स्वप्ना साडेकर, प्रा. प्रशांत दळवी उपस्थित होते.


दरवर्षी भारतामध्ये 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे. रॅली कर्जत शहरातून फिरून आल्यावर विद्यालयाच्या प्रांगणात लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी मतदानाची शपथही घेण्यात आली.

मुरुडमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांत 13 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जयेश चोडणेकर यांनी सर्व नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व पटवून दिले.


चला मतदान करुया, लोकशाही मजबूत करुया, मतदानाचा अमूल्य अधिकार बजावणे तुमचा हक्क आहे, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्रीय मतदार दिन उठा जागे व्हा, मतदार करा असे आवाहन यावेळी जयेश चोडणेकर यांनी केले. तसेच मतदारांकडून प्रतिज्ञाचे वाचन यावेळी करण्यात आले.

Exit mobile version