। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
निषाद सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळाचा 15 वा वर्धापन दिन साजरा झाला. या प्रसंगी निषादचे सर्व कार्यकारी अधिकारी, सभासद, सहकारी, मित्रपरिवार तसेच प्रमुख पाहुणे आ. जयंत पाटील, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात निषाद सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळाचे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे यांच्या प्रस्तावनेने झाली.
निषाद म्युझिकल नाईटच्या सुमधुर संगीत मैफिलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. 15 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून निषाद सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळाने काही कार्यगौरव पुरस्कार आ.जयंत पाटील यांच्या हस्ते सुपूर्त केले. यामध्ये यतीन घरत यांना त्यांच्या आजवर केलेल्या व्हिडियो डायरेक्शन, एडिटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातील सांस्कृतिक योगदानाबद्दल तसेच दिपक पवार यांना त्यांच्या ध्वनीसेवेतील योगदानाबद्दल कार्यगौरव करण्यात आला. चित्रलेखा पाटील यांचा देखील त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी निषाद एन्टरटेनमेन्ट च्या चेअरमन पदी असलेल्या विक्रांत वार्डे यांनी आपला कार्यभार संकल्प केळकर यांच्या कडे सुपूर्द करत त्यांना नवनिर्वाचित चेअरमन म्हणून घोषित केले. हा सन्मान चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.