अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 28 वा वर्धापन दिन साजरा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 28 वा वर्धापन बुधवारी (दि.18 ऑगस्ट) संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक भवनात मर्यादित सभासदांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी समारंभात संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांनी 10 ऑगस्ट रोजी वयाच्या 98 व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेची स्थापना 18 ऑगस्ट 1993 मध्ये निवृत्त न्यायाधीश एम.एम. पारकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. बुधवारी या संस्थेचा 28 वा वर्धापन दिन असल्याने संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. एम.एम. पारकर यांच्यापासून डी.डी. घरत, डी.डी. नाईक या माजी अध्यक्षांनी कोणत्या अडचणींना तोंड देत ही संस्था चालू ठेवली, याचीही माहिती सभासदांना करून दिली. संस्थेस नगरपालिकेकडून कार्यालयासाठी जागा मिळाल्यापासून खर्‍या अर्थाने संस्थेच्या कामात गती मिळाली व विविध योजना त्याद्वारे राबवण्यात आल्याची जाणीव त्यांनी उपस्थितांस करून दिली.
शेवटी उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून विद्यमान अध्यक्ष ल.नी. नातू यांनी आपल्या कार्यकाळात अलिबाग तालुक्यात एकूण 18 ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या शाखा ग्रामीण भागात निर्माण करण्याचे महान कार्य केल्याचे सांगून त्यांचा गौरव केला.
या कार्यक्रमास सचिव यशवंत थळे, कार्यकारिणी सदस्य गजेंद्र दळी, डी.डी. नाईक, राजा बने, चारुशीला कोरडे, मेघना कुळकर्णी, वसंत सिंगासने, ज्योती पाटील, पुरुषोत्तम साठे, आर.के. घरत, कुसुम पाटील व शरद कोरडे आदी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version