| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात 28 सप्टेंबर हा जागतिक अधिकार दिन साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून माहितीच्या अधिकाराबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ज्वेलर्स असोसिएशनचे शांतीलाल जैन व पत्रकारदेखील उपस्थित होते.
यावेळी श्रीवर्धनमधील ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी यांनी माहितीच्या अधिकाराबद्दल विशेष माहिती उपस्थितांसमोर सादर केली. माहितीचा अधिकार भारतामध्ये जरी 2005 सली लागू करण्यात आला असला तरी स्वीडन या देशामध्ये तो 1755 साली लागू करण्यात आला होता. भारतामध्ये माहितीचा अधिकार लागू करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशभरात चळवळ उभी केली होती. माहितीच्या अधिकारामुळे ज्या गोष्टींची माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना आहे, त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे पोलीस तपासात काही व्यत्यय येऊ शकत असेल तर तशी माहिती नाकारण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे देशाचे ऐक्य व अंतर्गत सुरक्षा याला कोणत्याही प्रकारे धोका पोहोचेल अशा प्रकारची माहिती नाकारणे हेदेखील यामध्ये नमूद केलेले आहे.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक संजय पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील माहितीच्या अधिकाराबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच सर्व पोलीस पाटलांना आपापल्या गावातील नागरिकांपर्यंत माहितीच्या अधिकाराबद्दल माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस राकेश म्हात्रे उपस्थित होते.