प्रशासन अंधारात की भागीदार?
| पेण | प्रतिनिधी |
बोरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ‘सेलीब्रेशन रिसॉर्ट’वर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत कथित अनैतिक व्यवसाय उघडकीस आणल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित मालमत्तेची घरपट्टी ‘व्यावसायिक’ ऐवजी ‘घरगुती’ असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी एकूण 11 घरे व एक कार्यालय नोंदवलेले आहे. यापैकी चार घरे आणि एक कार्यालय गणेश सुरेश गायकर यांच्या नावावर असून उर्वरित सहा घरे, त्यात एक आरसीसी दुमजली बांधकाम, त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व मालमत्तांवर घरपट्टी ही घरगुती स्वरूपाची लावण्यात आली आहे. ग्रामसेवक गणेश पाटील यांनी यास दुजोरा दिला.
दरम्यान, संबंधित रिसॉर्टचा वापर मागील 8 ते 9 वर्षांपासून व्यावसायिक स्वरूपात होत असल्याची चर्चा असून, अशा परिस्थितीत घरपट्टीचा प्रकार योग्य आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच रिसॉर्ट सर्रास व्यावसायिक वापरात असताना प्रशासनाने कारवाई का केली नाही, हा सर्वात मोठा सवाल आहे.
यातच खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रिसॉर्ट भाडेपट्ट्यावर दिला होता. पण तो नेमका कुणाला आणि किती काळासाठी दिला, याबाबत अद्यापही मौन बाळगले जात आहे.
या संदर्भात पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सांगितले की, जर इमारतीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे आढळले, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 अंतर्गत संबंधित कलमानुसार कारवाई करून कर वसुली केली जाईल.
दरम्यान, सदर रिसॉर्ट भाडेपट्ट्यावर दिला होता का, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसून, पोलीस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात मालमत्तेचा वापर, कर आकारणी आणि प्रशासनाची भूमिका याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






