‌‘सेलिब्रेशन’चा कर घोटाळा उघड

कृषीवलच्या पाठपुराव्यानंतर मोठा खुलासा; ‌‘घरगुती’च्या आड लाखोंचा महसूल बुडवला

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ‌‘घरगुती’ कराच्या आड वर्षानुवर्षे महसूल बुडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर दैनिक कृषीवलने सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला अखेर कारवाई करावी लागली.

बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सेलिब्रेशन रिसॉर्टवर अलीकडेच पोलिसांनी टाकलेल्या धाडीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणातील अनियमितता आता एकामागोमाग एक उघड होत आहेत. त्यातच रिसॉर्टवर अनेक वर्षे व्यावसायिक कराऐवजी ‌‘घरगुती’ कर आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

कृषीवलने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्णतः व्यावसायिक वापरासाठी उभारलेल्या या रिसॉर्टला मुद्दाम ‌‘घरगुती’ कर लावण्यात आला होता. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून, हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

25 मार्च रोजी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 च्या कलम 124 अंतर्गत तातडीने चौकशीचे आदेश दिले. चौकशीत रिसॉर्टवर चुकीचा कर लावल्याचे स्पष्ट झाले असून, यामध्ये ग्रामसेवकाची जबाबदारी ठळकपणे समोर आली आहे.

एखादे बांधकाम घरगुती की व्यावसायिक याची खातरजमा करणे हे ग्रामसेवकाचे कर्तव्य असताना, बोरगावमध्ये गेल्या 8-9 वर्षांपासून एकाच ग्रामसेवकाच्या अखत्यारीत हा कारभार सुरू असल्याने ‌‘हितसंबंध’ जोपासले गेले का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या रिसॉर्टकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होणे संशयास्पद मानले जात आहे. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट निर्देश देत, सेलीब्रेशन रिसॉर्टला बांधकामाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक कर आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा होणार असून, संबंधितांवर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version