। पेण । प्रतिनिधी ।
ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेणतर्फे साईबाबांच्या भव्यदिव्य पालखी मिरवणुकीचे पेण शहरात अयोजन करण्यात आले. त्यामुळे गुरूवार, दि.28 नोव्हेंबर रोजी संपूर्ण पेण शहर साईमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी सात वाजता विद्युत रोषणाई, ब्रॉसबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणूक सोहळ्यामध्ये दोन चलचित्र रथ सामील झाले होते. यामध्ये द्वारकामाई मंदिर, दत्त महाराज आणि स्वामी समर्थ रथ, साईबाबा साकारलेले कलाकार यांचा विशेष समावेश होता.
पेण साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राजू पोटे मार्ग, कोळीवाडा, महावीर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरवण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला होता. सर्व महिलांचा एकच पेहराव असल्याने हा पालखी सोहळा अतिशय देखणा दिसत होता. पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले होते.
गेली 16 वर्षे ओम साई पदयात्रा मित्र मंडळ पेण ते शिर्डीपर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत. सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली, विकास पाटील, दिनेश शहा, विकी ठाकूर व त्यांचे शेकडो सहाकारी साई सेवकांनी मेहनत घेतली.






