। मुंबई। प्रतिनिधी।
ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी प्रवाशांनी लोकल ट्रेनमधून खाली उतरुन रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणे पसंत केले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेन गेल्या एक तासापासून रखडल्या आहेत. एका मागे एक अशा लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाचे ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांना मदत करत थांबलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, लोकल ट्रेन एकाच जागेवर उभ्या राहिल्यामुळे प्रवासी वैतागले असून अनेक प्रवाशांनी खाली उतरून रेल्वे रुळावरुन चालत पुढे जाणे पसंत केले आहे.