महिलांच्या मागणीची सीईओंकडून दखल

पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी घेतली भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

जलजीवन योजनेत जुन्या टाकीऐवजी नवीन टाकीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी वळवली येथील महिलांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडे केली होती. त्यानंतर तातडीने हालचाली सुरु झाल्या. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर यांनी सायंकाळी महिलांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. वरीष्ठांसोबत चर्चा करून हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन त्यांनी देले.

वळवली येथे सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये जुन्या टाकीद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. वळवली येथील गावाचा विस्तार, वाढती लोकसंख्या तसेच जीर्ण झालेल्या जुन्या टाकीमुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती महिलांनी व्यक्त केली. या योजनेत नवीन टाकी बांधण्याची मागणी महिलांनी केली होती. मात्र ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. महिलांच्या या प्रश्नांबाबत बास्टेवाड यांनी सकारात्मक चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चवरकर यांना दिली. त्यानंतर सायंकाळी चवकर यांनी वळवली गावाला भेट दिली. तेथील महिलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महिलांनी यावेळी नवीन टाकीची मागणी केली. त्यावेळी चवरकर यांनी वरीष्ठांसोबत चर्चा करून लवकरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.

Exit mobile version