सोमवारपर्यंत न्याय न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार
| रसायनी | वार्ताहर |
अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील केंद्र सरकारच्या एचपीसीएल प्रकल्पामध्ये स्थानिकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी व माथाडीमध्ये स्थानिकांना काम मिळावे याकरिता महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट माथाडी आणि जनरल युनियनचे अध्यक्ष सुनील सोनावळे व मारूती राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एचपीसीएलविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी 9 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
याअगोदर 8 मार्च 2023 रोजी जांभिवली व चावणे भूमीहीन शेतकऱ्यांनी एचपीसीएल कंपनीविरोधात आमरण उपोषण केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविण्याकरिता स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानुसार लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याचे आश्वासन दिल्याने ते उपोषण स्थगित करण्याची सूचना उपोषणकर्त्यांना करण्यात आली होती. परंतु, सहा महिने होऊनही स्थानिक कामगारांचा प्रश्न मार्गी न लागल्याने प्रकल्पग्रस्तांनी सोमवार, दि.9 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.
याबाबत कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामासाठी अलिबाग येथील ठेकेदार अनंता गोंधळी यांना बाहेरील माणसे पुरवून कंपनीत काम चालू केले आहे. यात स्थानिकांना डावलले जात आहे. स्थानिकांना माथाडी काम मिळावे यासाठी या उपोषण सुरु आहे.
गेल्या वेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी कंपनी व्यवस्थापन कामगारांना समाविष्ट करून घेऊ, अशी ग्वाही दिली होती. परंतु, जैसे थे परिस्थिती आहे, यामुळे मारूती पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी साखळी उपोषणास बसले आहेत. आमचा निर्णय येत्या सोमवार, 16 ऑक्टोबरपर्यंत न लागल्यास आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरुन एचपीसीएलचे गॅस टँकर बंद करु, असा इशारा मारूती पाटील आणि उपसरपंच मीनल धनाजी ठोंबरे यांनी दिला आहे. त्यांना जांभिवली ग्रामपंचायत, चावणे ग्रामपंचायत, कराडे खुर्द ग्रामपंचायत व आसपासच्या ग्रामपंचायत तसेच सर्वपक्षीय व सामाजिक संघटना व परीसरातील नागरिक पाठिंबा दर्शविणार आहेत. यावेळी उपसरपंच मीनल ठोंबरे यांनी स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचे सांगितले.