रेल्वेलाईनच्या स्फोटाने नुकसान
| वेणगाव | वार्ताहर |
कर्जत-पनवेल रेल्वे लाईनच्या कामात करण्यात आलेल्या स्फोटाने झालेले नुकसान भरुन दिले जावे. या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनापासूनच हालिवली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी अखेर आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्या जुन्या नगरपरिषदेच्या शेजारी ग्रामस्थांना घेऊन साखळी उपोषणाला बसल्या आहेत. हालिवली-किरवली या गावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगराला समतेपेक्षा जास्त स्फोट करून, पोखरून रेल्वे बोगद्याचे काम ठेकेदार मार्फत करत आहे. या हादऱ्याने येथील नागरिकांच्या घराचे अंतोनात नुकसान झाले आहे. भविष्यात या कामामुळे नुकतीच चौक येथे घडलेली इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते याची जाणीव करत सरपंच प्रमिला बोराडे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली होती. यासाठी ग्रामस्थांनी ठेकेदारचे काम देखील बंद केले होते. मात्र ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी विरोध करून ही त्याने काम पुन्हा सुरू केले. ठेकेदार हा प्रशासनाला देखील जूमानात नसल्याचे दिसत असून झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा? भविष्यात कुठलीही गंभीर घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? अशी विचारणा ग्रामस्थांनी केली. याबाबत कर्जत तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी रेल्वे प्रशासन, ठेकेदार, सरपंच प्रमिला बोराडे, हालवली ग्रामस्थ यांची बैठक घेतली. मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी साखळी उपोषणचा निर्णय़ घेतला.
हालवली गावच्या लगत रेल्वे बोगद्याचे काम चालू आहे. विकास कामास आम्हा ग्रामस्थांचा विरोध नाही, परंतु त्यासाठी ठेकेदार सर्व नियमाची पायमल्ली करून स्फोट करत आहे. या धक्क्यामुळे हालिवली गाव, आदिवासी वाडी, किरवली बौद्ध नगर व किरवली गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले आहेत. यावर्षी दोन्ही गावातील बोरवेलचे पाणी गेल्यामुळे लोकांना दुष्काळ दृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.
प्रमिला बोराडे, सरपंच, हालिवली
इर्शाळवाडीची दुर्घटना स्फोटामुळे? इर्शालवाडी दुर्घटनेस या भागात होत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या स्फोटाचे काम कारणीभूत असावे, अशी चर्चा आहे. कारण यापूर्वी हा डोंगरातून कर्जत-पनवेल रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला. हा डोंगर समांतर रेषेत तीन ठिकाणी पोखरला गेला आहे. याच डोंगराच्या पलीकडे इर्शालवाडी आहे. तेथील डोंगराची दरड पडली नाही. डोंगराचे आतून खच्चीकरण होऊन भुख्खलन झालेले आहे. त्यामुळे या घटनेच्या अभ्यास करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना बोलवावे व इर्शालवाडी आणि परिसराचा निपक्षपाती अहवाल तयार करावा, ज्यामुळे संभाव्य धोक्याची कल्पना नक्कीच येईल.
भविष्यात अशाच पद्धतीने हालीवली गावचा डोंगर कमकुवत होऊन त्याची देखील भुख्खळण झाले तर वरच्या बाजूस असलेले मोरवे धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. होणारे गंभीर दुष्परिणाम कर्जतचे तहसीलदार यांना कळवून देखील ते काही जागेची पाहणी करण्यासाठी येत नाहीत, असा आरोपही ग्रामस्थांनी केलेला आहे. आतापर्यंत फक्त अर्धवट पंचनामे झाले आहेत. प्रशासनाने दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे व दोन्ही आदिवासी वाड्या कीरवली बौद्ध नगर व आजूबाजूचा बाधित परिसर यांचे झालेली नुकसान, भविष्यातील होणारे संभाव्य नुकसान याची सर्व जबाबदारी घेऊन योग्य भरपाई देत नाही किंबहुना त्याची जबाबदारी घेत नसल्याने, जोवर न्याय मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरू राहील, असे मत हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी दिला आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहेत.