बचाव समितीच्या बैठकीत झाला निर्णय
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील समस्या आणि अडचणीबाबत गेली दीड महिना शांत असलेली कर्जत शहर बचाव समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शहरातील समस्या सोडविण्यात कर्जत नगरपरिषद अपयशी झाल्याने कर्जत नगरपरिषदेच्याविरुद्ध कर्जत शहर बचाव समिती 16 डिसेंबरपासून साखळी उपोषण करणार आहे.
अॅड. कैलास मोरे यांनी कर्जत नगरपरिषदेला आपल्याकडून निवडणुका असल्याने दिड महिना दिला आहे. त्यानंतरदेखील पालिका सुस्त असल्याने कर्जत शहर बचाव समितीने पालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. कृष्णा जाधव यांनी शहरातील नागरिक बचाव समितीच्या ग्रुपवर शहरातील विविध भागातील समस्या या पोस्टद्वारे मांडत असतात. शहरातील समस्या पालिका कर्मचारी सोडत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर भारती कांबळे आणि विद्या वनगे यांनी शहरातील बहुसंख्य विभागात फवारणी केली जात नाही अशी तक्रार केली. राजेश लाड यांनी पालिका एवढी निष्क्रिय असेल तर मोठे जनआंदोलन उभे राहायला हवे अशी सूचना केली. शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन पालिका आजही कमी करू शकली नाही, याबद्दल विजय बेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
कर्जत शहरातील समस्या आणि अडचणी यांच्याबाबत अॅड. कैलास मोरे यांनी भूमिका मांडताना आपण बुधवारी पालिकेला निवेदन देणार आहोत. त्यानंतर 14 डिसेंबरपर्यंत पालिकेला वेळ देणार असून 16 डिसेंबर रोजी कर्जत शहरात लोकमान्य टिळक चौक येथे साखळी उपोषण सुरू करणार आहोत, असे जाहीर केले. त्यासाठी शहरातील सर्व 18 प्रभागमधील नागरिक यांनी साखळी उपोषणाला बसले जाणार आहेत. त्यात शहरातील वाहतुकीची समस्या असून तालुक्यातून येणारे ग्रामस्थ यांनादेखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना सदस्यांना करण्यात आली. शहरात साखळी उपोषणाचे बॅनर दोन दिवसात लावले जातील असे जाहीर करण्यात आले आहे. विविध संस्था, संघटना यांचा पाठिंबा आंदोलनासाठी घेण्यात येणार असून त्यासाठी समितीचे सदस्य प्रयत्न करणार आहेत.