| नेरळ | प्रतिनिधी |
अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यात वीज खंडित झाली होती. त्याचा फायदा घेऊन नेरळ बाजारपेठेत असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीनची तोडफोड करून चोरीचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, नेरळ व्यापारी फेडरेशनकडून नेरळ पोलिसांची भेट घेऊन त्या चोरट्यांचा लवकरात लवकर पकडून आणण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी आठ दिवसांच्या आत अंबरनाथ येथून त्या चोरट्यांना पकडून आणत गजाआड केले आहे.
15 मे रोजी रात्री नेरळ परिसरात रात्रीच्या वेळी लाईट नव्हती. त्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी नेरळ बाजारपेठेत आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन कोणत्यातरी हत्याराने फोडून त्यामधील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहायक फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, पोलीस शिपाई निरंजन दवणे, राजेभाऊ केकाण, विनोद वांगणेकर यांना मार्गदर्शन केले असता संबंधित पथकाने तपास सुरू केला होता. नेरळ रेल्वे स्टेशन येथून प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात आरोपी वांगणी येथून किशोर दौलत शिंदे यास दि.20 मे रोजी 3.57 वाजता अटक करण्यात आली. त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक हा गुन्हा केल्यापासून फरार असल्याची माहिती त्याच्याकडून प्राप्त झालेली असून, पोलीस त्या फरारी साथीदाराचादेखील शोध घेत आहेत.
आरोपीला पकडण्यात आल्यानंतर नेरळ व्यापारी फेडरेशनकडून नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि अन्य तपासी अधिकारी यांची भेट घेऊन चोरट्याला तात्काळ अटक केल्याबद्दल आभार मानले.
एटीएम फोडणार्यांना ठोकल्या बेड्या
