बंदीत चेअरमनची बोट मासेमारीवर

| उरण | प्रतिनिधी |

करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी स्वतःची मासेमारी बोट पावसाळी बंदीच्या काळात, म्हणजेच दि. 17 जुलै रोजी समुद्रात पाठवली असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. या मासेमारीत किती मासळी मिळाली, ती कोणत्या दराने विकली गेली, त्यात खर्च व नफा किती झाला, याचे तपशीलदेखील खुद्द चेअरमन यांनी लेखी स्वरूपात सादर केले आहेत.

बंदीकाळातील मासेमारी ही मत्स्यविभागातील काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवघेव व संगनमतातूनच सुरू असल्याची माहिती करंजा येथील कोळी समाजातील काही स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळी बंदी असतानाही काही विशेष बोटी व व्यक्तींना सूट देण्यात आल्याचा संशय आता स्पष्ट होत चालला आहे.
दरम्यान, मत्स्यविभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील व उरणचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे यांना यासंदर्भात वारंवार विचारणा करूनही त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यांनी यावर मौन बाळगणे हेच त्यांच्या सहभागाचे संकेत असल्याचा आरोप सामाजिक स्तरावरून होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मत्स्यविभागातील अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणात अविश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांपासून ते मिळवलेल्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे केल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी उरणमधील मच्छिमार समाज व जनतेकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version